Advertisement
अजित पवार यांचं सर्वात मोठं विधान
बीड : कर्मधर्म संयोगाने, आईवडिलांच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं, असं विधान अजित पवार यांनी केलं. आपल्या यशाचे सर्व श्रेय अजितदादांनी शरद पवार यांनाच दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर असून तेथे त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी बीडमधील स्थानिक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांची भेट घेत संवाद साधला. युवा संवाद मेळाव्यातील भाषणामधून अजित दादांनी कार्यकर्त्यांना, युवा नेत्यांनाही संबोधित केलं. अनुभवाचे, उपदेशाचे चार बोल ऐकवत अजित पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांना काही कानपिचक्याही दिल्या. प्रचार प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी काय काय करावे याच्या मार्गदर्शक सूचनाही अजित दादांनी दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. काही काळापासून शरद पवार आणि अजित पवार हे वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त बऱ्याचदा एका मंचावर आले होते, पण ती फक्त औपचारिकच भेट होती. मात्र दोन्ही पक्षात पडलेली फूट, मनातील अंतर या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांनी अचानक हे विधान करत शरद पवारांची आठवण काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. युवा संवाद मेळाव्यात अजित पवारांनी तरूणांना मार्गदर्शन केलं. युवकांचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण, व्यवसाय आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करण्यासाठी युवकांचे संघटन नीट असलं पाहिजे. काही लोक भेटले ते म्हणाले बीडमध्ये काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. त्यांनी केल्या. मला निवेदन दिलं, मी त्यांना समर्थन दिलं. अधिकारी त्यांचे काम करत आहेत, तुम्ही तुमचे काम करा. गाव पातळीपर्यंत आपलं संघटन गेलं पाहिजे. लोकांच्या फक्त समस्या ऐकू नका, त्यांच्या चर्चांवर मार्ग काढा. त्या समस्या सोडवा, असा सल्ला अजित पवारनी दिला.
हाराचा बोझा आहे मानगुटीवर. काही देऊ नका. कर्मधर्म संयोगाने, आईवडिलांच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं. काही देऊ नका. फक्त प्रेम द्या. माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार घ्या. पायाही पडू नका. आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाही. ज्यांच्या पाया पडता त्याची हिस्ट्री आठवा. म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो. आईबापाच्या पाया पडा, गुरूच्या पाया पडा. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक ही आभाळा एवढी माणसं होती. त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना. छत्रपती शिवाजी महाराज आहे. संभाजी महाराज आहे. राजमाता जिजाऊ, बाबासाहेब आंबेडकर आहे, महात्मा फुले आहेत. मौलाना आझाद आहे, अण्णा भाऊ साठे आहेत. युगपुरुष होऊन गेले. किती महिला. किती जणांची नावे घेऊ. वाईट वाटू नका. महापुरुषांच्या पाया पडा. पण उगाचच कोणत्याही नेत्याच्या पाया पडू नका. ही लाचारी पत्करल्यासारखं होतं. का पाया पडायचं? राम राम म्हणायच. नमस्कार करा. सलामवालेकूम म्हणा. काय हरकत आहे. आपण सर्व जाती धर्माचा आदर केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.