Advertisement
मुंबई : राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवारांनी अनेकवेळा शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. मात्र, बीडमधील कार्यक्रमात याच अजित पवारांना शरद पवारांबाबत प्रेमाचा उमाळा आलाय. चुलत्याच्या कृपेनं आपलं बरं चाललंय असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागत अनेक आरोप केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार चांगलेच मवाळ झाल्याचं पाहायला मिळाले.. तसंच अजित पवारांनी आज केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र शरद पवारांवर निशाणा साधलाय. काकांना आशीर्वादापुरतचं मर्यादित ठेवल्याचा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय. काकांना आशीर्वादासाठी मर्यादीत त्यांनी ठेवलं आहे. हे तुम्हाला कोणालाच लक्षात आलेलं नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं.