Advertisement
पुणे : पिंपरी चिंचवडच्या चिखली आणि मोशी या परिसरातील नागरिकांच्या वसाहतीमध्ये दारूची दुकाने असल्यामुळे या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.मात्र, आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लोकवस्तीमध्ये असलेल्या चार दुकानांवर कारवाई करत दारूची दुकाने आता सील करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
विधानसभा अधिवेशनादरम्यान भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी वसाहतीमध्ये सुरु असलेल्या दारूच्या दुकानासंदर्भात प्रश्न उपस्थित करत त्यासंबंधीची नियमावली बदलण्याची मागणी केली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वसाहतीमधील 50% नागरिकांचा आक्षेप असेल तर त्या ठिकाणी दारूचे दुकान बंद केले जाईल असे स्पष्ट केले होते. त्याच बदललेल्या नियमावलींचा आधार घेत उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांच्या मागणीनुसार चार दुकानांवर कारवाई करत ती सील केली आहेत. दारूच्या दुकानात संदर्भातील हा नियम फक्त पिंपरी चिंचवड नाही तर राज्यभरासाठी लागू आहे. त्यामुळे नागरिकांना दारूच्या दुकानाचा त्रास होत असेल तर त्यांनी विरोध नोंदवत ती बंद करावीत असं आवाहन महेश लांडगे यांनी केलं आहे.