Advertisement
मुंबई : मराठा समाजाला OBC समाजामधून आक्षण देण्याची मागणी केली जात आहे. कुणबीसह अनेक प्रवर्गांचा ओबीसी यादीत समावेश आहे. अशातच आता महाराष्ट्रातील ‘भोयर पवार’ समाजाला ओबीसी यादीत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा खासदार अमर काळे यांनी सभागृहात ‘भोयर पवार’ समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली. महाराष्ट्रातील वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात भोयर पवार समाज मोठ्या संख्येने राहतो. विदर्भात या समाजाची लोकसंख्या जवळपास 20 लाख आहे. महाराष्ट्रात या समाजाला ओबीसीच्या सवलती प्राप्त आहेत, परंतु केंद्र सरकारच्या ओबीसी यादीत भोयर पवार समाजाचा समावेश नाही.
महाराष्ट्र सरकारने भोयर पवार समाजाला केंद्रीय ओबीसी यादीत समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. 8 ऑक्टोबर 2024 रोजी ‘नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लास’ने यावर सुनावणी घेतली आणि भोयर पवार तसेच इतर 14 जातींना केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्याची शिफारस केली. परंतु, या शिफारशींनंतर सुद्धा भोयर पवार आणि इतर 14 जातींचा समावेश अद्याप केंद्राच्या ओबीसी यादीत केला गेलेला नाही. त्यामुळे, या समाजाच्या मुलांचे शैक्षणिक दृष्ट्या मोठे नुकसान होत आहे. या सगळ्या 15 जातींना तत्काळ केंद्रीय ओबीसी यादीत समाविष्ट करावं अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.