Advertisement
मुंबई : दिशा सालियानची हत्या झाली असल्याचा दावा करत याची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी दिशाच्या वडीलांनी केली आहे. या प्रकरणी दिशाचा बाजू ऍड. निलेश ओझा हे मांडणार आहेत. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरें बरोबर उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी केलं जावं अशी मागणी ओझा यांनी केली आहे. शिवाय त्याबाबतचे पुरावे ही आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. त्याच बरोबर आदित्य ठाकरे हे ड्रग्ज पुरवठादार असल्याचा आरोपही केला होता. त्यांचा गुन्हा लपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा गैर वापर केल्याचं ही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे हे ऍड. ओझा नेमके कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.
अॅड. निलेश ओझा सध्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची केस लढत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून इंडियन बार असोसिएशन नॅशनल प्रेसिडेंट म्हणून ते कार्यरत आहेत. न्यायालयीन भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा निलेश ओझा यांनी प्रयत्न केला होता. त्यांचे वकील मित्र विजय कुर्ले यांनी सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांबद्दल भ्रष्टाचार केल्यासंदर्भातील वक्तव्य केले होते. त्यानंतर न्यायाधीशांनी सुमोटो या प्रकरणाची सुनावणी केली होती. शिवाय कोर्ट अवमान याचिका ही दाखल केली होती. त्याच वेळी इंडियन नॅशनल बार असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या निलेश ओझांना या प्रकरणात पार्टी करण्यात आले होते. ही याचिका साधारण 17 जुलै 2021 मध्ये दाखल झाली.
मात्र न्यायाधिशांवर जे आरोप करण्यात आले त्या प्रकरणी कुठले ही पुरावे सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली होती. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी वकील निलेश ओझा, राशिद खान पठाण आणि विजय कुर्ले यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. तिन्ही वकिलांना कोर्टाने तीन महिन्यांचा कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ही ठोठावला होता. दोन न्यायाधीशांच्या विरोधात गंभीर आरोप करून कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली होती.