Advertisement
सांगली : विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव झटकून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने संघटना बांधणीकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला पक्ष लागला आहे. त्यासाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे, असे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. त्याच बरोबर आगामी काळात ओबीसींचे प्रश्न हाती घ्या असं सांगत पुढचा प्लॅन ही त्यांनी स्पष्ट केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने राष्ट्रवादीने मिशन ओबीसी हातात घेतले आहे. सांगलीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर होतील. पण त्या पेक्षा प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या मतदार संघाकडे लक्ष द्यावे असा सल्ला जयंत पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे पुढच्या तयारीला लागा असंही त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत ओबीसींच्या छोट्या घटकांसाठी महामंडळाची घोषणा करण्यात आली. 17 महामंडळं तयार करण्यात आली. पण नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या महामंडळांचा साधा उल्लेख ही नाही. निधी तर दुरची गोष्ट झाली. अशा प्रकारे या समाजाची फसवणूक झाली आहे असा आरोप जयंत पाटील यांनी या निमित्ताने केला.
ओबीसी समाजाला निवडणुकी पुरता आश्वासन देण्यात आलं. मात्र त्यानंतर त्यांची फसवणूक केली. घोषणा हवेत विरल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता ओबीसीचे प्रश्न हाती घेतले पाहीजेत. ते प्रश्न घेवून तालुक्यात जिल्ह्यात लढाई लढली पाहीजे. सरकारने ओबीसीं बरोबर काय केलं हे त्या समाजाच्या लक्षात येईलच. पण तुम्ही आता या समाजाचे प्रश्न हातात घ्या असं ही पाटील या वेळी म्हणाले. ओबीसी बाबत आपली ठाम मतं मांडा. ओबीसींना विश्वासात घ्या. त्यांचे प्रश्न प्रभावी पणे मांडा असा सल्लाही पाटील यांनी दिला. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीने आपला मोर्चा ओबीसींकडे वळवला आहे.