Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांचा सल्ला
मंगळवेढा : लाडक्या बहिणींच्या मतांवर सत्ता स्थापन केली हे विसरू नका. अर्थमंत्रालयाने सादर केलेल्या 2100 रुपये लाडक्या बहिणीला देण्याच्या फाईलवर सही करा, योजनेला पैसे कमी पडत असतील तर मानधन बंद करा, अशी तयारी खरं तर सत्ताधारी पक्षाच्या 225 आमदारांनी दाखवली पाहिजे, अशी शालजोडीतील टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली.
भैरवनाथ उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्या संपर्क कार्यालयाचे मंगळेवढ्यात उद्घाटन करण्यात आले. त्या कार्यक्रमात बोलताना लक्ष्मणराव ढोबळे बोलत होते. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य शासनावर टीका केली. ते म्हणाले की , खिशाचा पेन विकला तरी चालेल. पण, लाडकी बहिण योजना बंद करू देणार नाही, पुढील हप्ता 2100 रुपये देऊ, असे अजितदादांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितले होते, त्यामुळे त्यांच्याच अर्थमंत्र्यालयाने तयार केलेल्या 2100 रुपये देण्याच्या फाईलवर त्यांनी सही करायला हवी.
या योजनेला पैसे कमी पडत असतील तर सत्ताधारी आमदारांनी स्वतःहून आपले मानधन बंद करण्याची तयारी दाखवायला हवी, अशी अपेक्षाही ढोबळे यांनी व्यक्त केली.
लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भविष्यात संघर्ष करावा लागेल. प्रसंगी दामाजीपंतांसारखे अधिकाऱ्यांना हात जोडून सर्वसामान्यांच्या प्रश्नाची सोडवणूक केली जाईल. सध्या सुमारे 70 महामंडळाचे कामकाज बंद आहे. तसेच, शिक्षकांचेही पगार थांबलेले आहेत. त्यावरून महामंडळाच्या माध्यमातून सरकारला जनतेची काळजी होती की, या महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची काळजी होती, याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचेही ढोबळे म्हणाले.
यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता ढोबळे यांनी मार्मिक भाषेत टीका केली. मुलं माझी आहेत, बायको माझी नाही, असे न्यायालयात सांगणे म्हणजे, बायकोला चिनी बाजारातील वस्तू समजण्यासारखे आहे. हा प्रकार 376 ला धरून होत, असल्याची टीका ढोबळे यांनी केली. मुस्लीम समाजाच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली असल्याचेही प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अॅड नंदकुमार पवार, राहुल शहा, चंद्रशेखर कोंडूभैरी, प्रा. येताळा भगत, राहुल घुले उपस्थित होते.