Advertisement
सातारा : ग्रामविकास मंत्री आणि भाजपा नेते जयकुमार गोरेंवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेलाच खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 1 कोटींची खंडणी स्वीकारताना महिलेला अटक करण्यात आली. गोरेंवर आरोप करणारी महिलाच खंडणीखोर निघाल्यानं या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. यावरून राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप प्रकरण मिटवण्यासाठी महिलेनं 3 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. त्यामधील 1 कोटीची रक्कम स्वीकारताना महिलेला अटक करण्यात आली आहे. सातारा गुन्हे शाखेनं महिलेला अटक केली आहे. आरोप करणारी महिलाच खंडणी मागत असल्याचं उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे.
यावरून आता विरोधकांनी गोरेंवर निशाणा साधला आहे. कायद्याचा गैरवापर होत असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे. तर महिलेला देण्यासाठी 1 कोटी रुपये कुठून आले असा सवाल आमदार रोहित पवारांनी केला आहे. विरोधकांचं असेल तर तक्रार करणाऱ्याच्या बाजूनं कारवाई होते आणि सत्ताधारी असल्यास तक्रारदारावरच कारवाई होते, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. तर महिलेनं खंडणी घेतली असेल तर नक्कीच त्याबाबत कारवाई केली जाईल, असं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. खंडणीचा हप्ता देण्यासाठी 1 कोटी रुपये इतके पैसे आले कुठून असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.