Advertisement
पुणे : स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार गुन्ह्यातील आरोपीची ओळख पटली असून, त्याचा फोटो समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे घटनेतील आरोपी जामिनीवर सुटलेला आहे, पोलिसांनीही पत्रकार परिषद घेत नेमकं काय घडलं आहे याची माहिती दिली.
पोलिस उपायुक्त स्रमार्थना पाटील यांनी सांगितलं की, पीडित तरुणी ही पुण्यात कामाला आहे. ती फलटणला गावाला जात होती. गावी जाण्यासाठी जिथे बस सुटतात तिथे ती बसली होती. तेव्हा आरोपी तिच्या आजूबाजूला घुटमळत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. काही वेळाने आरोपी तिच्या बाजूला येऊन बसला आणि तिची विचारपूस करु लागला. आरोपीने तिला कुठं जायचं असं विचारलं. तेव्हा तिने फलटणला जातेय, असं सांगितलं. तेव्हा त्याने साताऱ्याला जाणारी बस येथे लागत नाही असं सांगून दुसरीकडे नेले. पीडित तरुणीनेदेखील त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत गेली. मात्र त्याने दाखवलेल्या बसमध्ये अंधार पाहून तिने प्रश्न उपस्थित केला. तेव्हा त्याने ही रात्रीची बस असून आतमध्ये प्रवासी झोपलेले आहेत त्यामुळे अंधार आहे असं सांगून तिला विश्वास दिला. त्यानंतर ती बसमध्ये गेली तेव्हा त्याने तिला आत ढकलून बसचा दरवाजा बंद केला आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
घटना घडल्यानंतर पीडित तरुणी तिच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये जाऊन बसली. तेव्हा रस्त्यात असताना तिने तिच्या मित्राला या घटनेबद्दल सांगितलं. त्याने तिला पोलिसांत तक्रार दाखल कर, असा सल्ला दिला तेव्हा तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आम्ही आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपी जामिनावर सुटलेला असून शिरूर गावातील रहिवाशी आहे. सीसीटीव्हीत आरोपी दिसत असून आरोपीला शोधण्यासाठी 8 टीम तयार करण्यात आल्या आहेत, असंही पोलिस उपायुक्त स्रमार्थना पाटील यांनी सांगितलं.