Advertisement
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही व्यासपीठावर सादर केले साहित्य
: लक्ष्यवेधी प्रतिनिधी :
दिल्ली : देशाच्या राजधानीत तब्बल 71 वर्षानंतर साहित्य संमेलन भरले. दिल्लीत असणाऱ्या साहित्य प्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरली. मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि एक अपूर्व योग जुळून आला, याच पार्श्वभूमीवर, मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानीत झाले. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी ही बाब ठरली, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा शब्दप्रभू म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
दिल्ली येथे दि. २१, २२ आणि २३ फेब्रुवारीला मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत दिसून आले. यामध्ये सेालापूर जिल्ह्याने शब्दप्रभू म्हणून लोकमान्यता दिलेले लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपले निवडक साहित्य यावेळी मंचावर उपस्थित राहून सादर केले. यावेळी त्यांनी सदर भावना मांडल्या. दिल्ली दरबारी उपस्थितांनी ढोबळे यांच्या लेखणीला मोठी दाद दिली. राजकारणापलिकडील लेखक आणि कवि ढोबळे यावेळी उपस्थितांनी अनुभवला. लक्ष्मणराव ढोबळे यांनी सादर केलेल्या कविता मनाचा ठाव घेणाऱ्या होत्या. त्यांच्या लेखणीला अनुभवाची धार असल्याची प्रतिक्रिया मंचावर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली
संजय श्रीधर कांबळे यांनी वेधले लक्ष
दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी बार्शी येथील संजय श्रीधर कांबळे यांनी निर्माण केलेल्या AI तंत्रज्ञानाने निर्मित साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा चित्र प्रवास उलगडून दाखवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या प्रदर्शनाला भेट देत माजी मंत्री शब्दप्रभू लक्ष्मणराव ढोबळे यांनी या अभिनव उपक्रमाचे आणि संजय कांबळे यांच्या कलेचे कौतुक केले.
असा आहे संमेलनाचा आढावा
- संमेलनाच्या पहिल्या दिवशी 21 फेब्रुवारीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात ग्रंथ दिंडी आणि ध्वजारोहण झाले. प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीला प्रारंभ झाला.
- विज्ञान भवन येथे दुपारी साडे तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समारंभाचे उद्घाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार, प्रमुख पाहुणे देवेंद्र फडणवीस आणि संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भावळकर उपस्थित होत्या.
- पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मंत्री उदय सामंत, आशिष शेलार उपस्थित होते. शिवाय पूर्वाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचे भाषण झाले. रात्री 10.00 वाजेपर्यंत निमंत्रिताचे कवी संमेलन पार पडेल. या संमेलनाचे अध्यक्ष हे इंद्रजित भालेराव असतील.
- साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दि. 22 फेब्रुवारीला कवी कट्टा रंगला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात मराठी पाऊल पडते पुढे ही मुलाखत रंगली. दुपारी परिसंवाद झाला. बहुभाषीक कवी संमेलन, आनंदी गोपाळ परिचर्चा, शिवाय बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसाचे जीवन व साहित हा परिसंवादही झाला.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात आम्ही या विषयावर मुलाखत झाली यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, सुरेश प्रभू आणि निलम गोऱ्हे सहभागी झाले होते. सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य या विषयावरही परिसंवाद झाला. नाते दिल्लीशी मराठीचे हा परिसंवाद रंगला. या परिसंवादात ज्योतिरादित्य शिंदे, शिवेंद्रराजे भोसले आणि भूषणराजे होळकर सहभागी झाले होते. मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म या विषयावरही परिसंवाद रंगला होता.
- डॉ. बाबासाहेबा आंबेडकर सभामंडपात खुले अधिवेशन आणि संमेलनाचा समारोप झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विजय दर्डा, उदय सामंत, पी.डी. पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. नरेंद्र जाधव, साहू अखिलेश जैन यांचा सत्कार करण्यात आला.