Advertisement
मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही लोकांनी तर बॅनर लावून या दोन्ही भावांना एकत्र यावे म्हणून साकडं घातलं आहे. पण दोन्ही भावांकडून त्याला काही प्रतिसाद देण्यात आलेला नसला तरी आज एक सुखद चित्र पाहायला मिळालं. दोन्ही भाऊ एकत्र आले. गप्पा मारल्या, हास्य विनोदात रमले. तेही एका लग्नाच्या निमित्ताने. त्यांचे फोटोही व्हायरल झाले आहेत.
मुंबईत एका लग्नानिमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. अंधेरी येथे हा लग्न सोहळा होता. शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात दोन्ही भाऊ एकत्र आले होते. यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला. तिघेहीजण हास्यविनोदात रमलेले दिसले.
राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे लग्नात भेटल्यानंतर तिघेही गप्पा मारताना दिसले. तिघांमध्ये चांगलाच हास्यविनोद रंगला होता. तिघेही एकाच फ्रेममध्ये आल्यानंतर कॅमेरामनची फोटो काढण्यासाठी एकच तारांबळ उडाली. तिघांचीही हास्यविनोद करतानाची छबी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी कॅमेरामन सरसावले होते. क्षणार्धात कॅमेऱ्याचा किलकिलाट सुरू झाला. मात्र, तिघांनीही कॅमेऱ्यांकडे न पाहता गप्पा मारणं सुरूच ठेवलं होतं.
गेल्या तीन महिन्यातील भेटी
15 डिसेंबर 2024 : मुंबईतील ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नात हजेरी लावली होती.
22 डिसेंबर 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात एकत्र आले होते. दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात हे लग्न लागले. या लग्नाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आले होते.
23 फेब्रुवारी 2025 : शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात अंधेरी येथे भेट आणि मन मोकळ्या गप्पा.