Advertisement
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेला छावा चित्रपट सध्या तुफान गाजतो आहे. त्याचवेळी या चित्रपटावर या चित्रपटातील प्रसंगावर शिर्के कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. शिर्के कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकांना पुरावे दाखवण्याची नोटीस बजावली होती. दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यावं अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरु देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. शिर्के कुटुंबीयांच्या आक्षेपांना दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर दिलं आहे.
उतेकर यांनी दिलेल्या उत्तराची ऑडिओ क्लिप NDTV मराठीकडं आहे. त्यामध्ये त्यांनी हा चित्रपट संपूर्णपणे छावा या शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आहे. त्यामध्ये गणोजी शिर्के, कानोजी शिर्के, शिरकाण गावचे त्यांचं कुलदैवत कुठलं या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. त्याचबरोबर मी चुकीचा नसेन तर महाराजांवर जी टीव्ही मालिका आली होती त्यामध्येही अगदी तसंच नावासकट, गावासकट दाखवलं आहे, असं सांगितलं. या चित्रपटामध्ये मी त्यांचं नावही घेतलेलं नाही. गावही दाखवलेलं नाही. गणोजी आणि काणोजी या एकेरी नावानं त्यांचा चित्रपटात उल्लेख केला आहे. त्यांचं आडनाव अजिबात दाखवलेलं नाही. त्यांचं गाव कोणतं हे अजिबात दाखवलेलं नाही, या महत्त्वाच्या मुद्याकडं लक्ष वेधलं आहे.