Advertisement
मुंबई : वाल्मिक कराड याला जामीन मिळणार की नाही? तो सुटणार की अडकणार? त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल होणार की नाही? या सारखे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या बाबत ज्येष्ठ वकिलांनी माहिती दिली आहे.
जेष्ठ वकील प्रदीप घरत यांनी याबाबत कायदा काय आहे याबाबत माहिती दिली आहे. एखादा गुन्हेगार ज्या वेळी शरण येतो त्यावेळी त्याच्या लक्षात येते की आपण एखाद्या गुन्ह्यात पोलिसांना हवे आहोत. हे लक्षात घेता तो सरेंडर करतो. त्याचा फायदा त्याला जामीन मिळवताना होवू शकतो असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं. मी शरण आलो आहे. मी कुठेही पळून गेलो नाही याचा विचार जामीन देताना केला जातो. त्यामुळे ही कराड याच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. पण त्यालाच एक दुसरीबाजूही असल्याचे घरत सांगतात. जामीन हा मेरीटवर दिला जातो. त्याचा गुन्ह्यात किती सहभाग आहे? गुन्हा किती गंभीर आहे? तो साक्षिदारांना किती प्रभावीत करू शकतो? याचा विचारही जामीन देताना केला जातो. त्यामुळे अशा प्रकरणात जामीन मिळणे कठीण असते असंही घरत म्हणाले.
सीआयडी या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे म्हणणे ऐकून घेईल. शिवाय त्यांची चौकशीही करेल. सीआयडीला यामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग दिसला तर त्यांना अटक केली जाईल. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल. तिथे त्याच्या रिमांडची मागणी केली जाईल. शिवाय तपासात काय आढळून आलं आहे? हे न्यायालयाला दाखवावं लागेल. किंवा आज चौकशी केल्यानंतर त्यांना परत घरा जावून पुन्हा गरज लागल्यास चौकशीसाठी बोलवलं जाईल असं वकील अनिकेत निकम यांनी स्पष्ट केलं.