Advertisement
मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा तपास सुरु असतानाच या प्रकरणाशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडेंचा संबंध असल्याचा आरोप करत त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. असं असतानाच आता सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा आणि वाल्मिक कराडवर कलम 302 म्हणजेच हत्येच्या गुन्ह्याअंतर्गत खटला चालवावा अशा मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं आहे. मात्र एकीकडे अशी मागणी होत असतानाच आता धनंजय मुंडेंच्या मदतीला छगन भुजबळ धावून आले आहेत. धनंजय मुंडेंविरोधात अद्याप काहीही सिद्ध झालेलं नाही त्यामुळे आधीच त्यांचा राजीनामा घेणं आपल्याला पटत नाही असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. मुंबईमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.
बीड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वादात सापडलेल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन त्याऐवजी मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या छगन भुजबळांना संधी दिली जावी अशी मागणी समर्थकांकडून केली जात असतानाच छगन भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणाचा तरी मंत्रिपद काढून मला मला द्या, असा विचार माझ्या मनात देखील येणार नाही, असं भुजबळ म्हणाले. पुढे बोलताना, आका की काका जे कोणी असतील ते जर दोषी आढळले तर कारवाई करण्यात येणार. त्याच्या आधीच त्यांनी (धनंजय मुंडेंनी) राजीनामा का द्यावा?" असा सवाल भुजबळांनी विचारला आहे.