Advertisement
भुजबळ-कोकाटे यांच्यामध्ये नवा संघर्ष
मुंबई : छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातले दोन बडे नेते आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांमध्येच जुंपली आहे. माणिकराव कोकाटेंनी केलेल्या टीकेला छगन भुजबळांनी खास स्टाईलनं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे भुजबळ-कोकाटे हा नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. छगन भुजबळांना मंत्रीपद न दिल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांच्याच पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकोटे यांनी त्यावरून भुजबळांना डिवचलंय. भुजबळ नाराज असतील तर सोडून द्या, त्यांचे किती लाड पुरवायचे असा थेट सवालच कोकाटे यांनी केला होता.
मात्र यावरून माजी मंत्री छगन भुजबळ प्रचंड भडकलेत. माणिकराव कोकाटेंना आपणच राष्ट्रवादीत आणल्याची आठवण भुजबळांनी त्यांना करून दिली. इतकंच नाही तर पक्षाच्या संस्थापकांपैकी आपण एक होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. यावरच न थांबता कोकाटेंचा थेट उपरे असा उल्लेख भुजबळांनी केला आहे. राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षातीलच दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. माणिकराव कोकाटेंना राष्ट्रवादीत आणण्याचा किस्सा छगन भुजबळ ऐकवत असले तरी एकेकाळी नाशकातील या दोन नेत्यांमधून विस्तवही जात नव्हता. माणिकराव कोकाटे हे छगन भुजबळांचे राजकीय विरोधक मानले जातात. भुजबळांच्या धोरणावर आणि कार्यपद्धतीवर कोकाटेंनी अनेकदा टीका केलेली आहे. आता पुन्हा एकदा कोकाटे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.