Advertisement
मुंबई : राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद वाचवण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांच्यासोबतच धनंजय मुंडे यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्याही भेटीगाठी घेत चर्चा सुरू केली आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
पवनचक्की खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याविरोधातही विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस, अंजली दमानिया, संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे पाटलांसह बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनीही धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची झोड उठवली आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी धावाधाव सुरू आहे.
धनंजय मुंडे यांनी जोरदार लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. 6 जानेवारीला धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्यासोबत भेट घेत तासभर चर्चा केली. अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी 7 जानेवारी रोजी कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी त्यांच्या सीजे हाऊस या निवासस्थानी जात तब्बल 2 तास चर्चा केली. 2 नेत्यांशी चर्चा करून समाधानी न झालेल्या धनंजय मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली आहे.