Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. स्वत: अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आपलं कुटुंब एकत्र यावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या इतर दिग्गज नेत्यांकडून शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र आले तर आपण स्वागतच करु, शरद पवार हे आपले दैवत असल्याच्या भावना त्यांच्याकडून मांडण्यात आल्या. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत 2 महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. जर शरद पवारांसोबत असणारे लोक आपल्यासोबत येणार असतील तर आधी जे अजित पवारांसोबत निष्ठावान राहिले त्यांचा विचार करावा. त्यांना विविध संधी द्याव्यात, अशी कार्यकर्त्यांनी आजच्या बैठकीत मागणी केली. 2 जुलैला पक्षात फूट पडली त्यावेळी अजित पवारांवर विश्वास ठेऊन जे आले होते त्यांना टीकेचा सामना करावा लागला. त्यामुळे ज्यांनी टीकेची झळ सोसली. त्यांच्यावर अन्याय नको, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे मागील काही दिवसांत पक्षातलेच पदाधिकारी एकमेकांवर ज्या प्रकारे टीका करतात त्यावरून पक्षाची नाहक बदनामी होत आहे. ती बदनामी थांबायला हवी, अशी भावना वरिष्ठ पदाधिकाऱ्यानी त्यांच्या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काळात विधान परिषद उमेदवारी, विविध महत्त्वाची पदे देताना एकाच व्यक्तीचा विचार केला जातोय, अशी टीका पक्षातील एका नेत्यावर इतर पदाधिकारी यांनी केली होती. त्यावर आजच्या बैठकीच चर्चा झाली.