Advertisement
धाराशिव : परभणी, बीड नंतर आता धाराशिव जिल्ह्यात गुंडांची दहशत समोर येत आहे. या तीनही जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का? असा रोकडा सवाल विरोधकांनी विचारला आहे. धाराशिवमध्ये पवनचक्की उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी मारहाण करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे पोलीसांकडे धाव घेतल्यावर पण ते बघ्याची भूमिका वठवत असल्याने त्यांच्याबद्दल रोष व्यक्त होत आहे.
जे एस डब्ल्यू या पवनचक्की कंपनीला तुळजापूर तालुक्यातील बारूळ गावातील ठोंबरे कुटुंबियांनी 20 गुंठे जमीन भाडे तत्त्वावर दिली आहे. मात्र या कंपनीकडून शेतकर्यांना दमदाटी करण्यात आली आहे. ठोंबरे यांची 22 गुंठे जमीन न घेता 35 गुंठे जमीन बळकवण्यात आली, असा आरोप ठोंबरे कुटुंबियांनी केला आहे. करारापेक्षा जास्त जमीन देण्यास शेतकऱ्याने विरोध केल्यावर जे एस डब्ल्यू या कंपनीच्या ठेकेदाराने भाडोत्री गुंडाकडून जमीन मालक सचिन ठोंबरे यांना बेदम मारहाण केली. या जीवघेण्या मारहाणीत शेतकरी सचिन ठोंबरे याच्या डोक्यात लोखंडी रॉड लागला. या मारहाणीत तो रक्त बंबाळ झाला. पण पोलिसांनी त्याची साधी तक्रार सुद्धा घेतली नसल्याचा आरोप सचिन ठोंबरे यांनी केला आहे.
शेतकर्यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पण तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. सचिन ठोंबरे यांनी थेट धाराशिवच्या जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार केली. मात्र गेली 21 तारखेपासून आजपर्यंत या तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याचे शेतकर्याकडून दावा करण्यात येत आहे.