Advertisement
नागरिकांची भेट घेत केली चर्चा; भूमिकेचे केले कौतूक
सोलापूर : सध्याचे निवडून आलेले सरकार हे इव्हीएम सरकार आहे, नागरिकांवर लादलेले सरकार आहे. मी स्वत: निम्मा-अर्धा महाराष्ट्रा फिरून सभा घेतल्या, महाराष्ट्राचा कौल असा एकअंगी जावूच शकत नाही. त्यामुळे मारकडवाडी येथील नागरिकांनी निवडणुकीतील यंत्रणांवर आक्षेप घेत उभारलेला लढा हा संपूर्ण राज्यासाठीच प्रेरणा देणारा आणि दिशादर्शक ठरणारा आहे. आताच्या सरकारला हादरवणारा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथील नागरिकांनी इव्हीएम विरोधात भूमिका घेत गावातील निवडणूक बॅलेट पेपरवर जाहीर केली होती, त्यानंतर अवघ्या राज्याचे वातावरण ढवळून निघाले. सत्ता स्थापनेच्या गडबडीतही ही निवडणूक मोडीत काढण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी दिले. या प्रक्रियेत गावातील नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर लक्ष्मणराव ढोबळे यांनी मारकडवाडीतील नागरिकांची भेट घेत पदाधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनीही निवडणूक यंत्रणेबाबत शंका उपस्थितीत करीत मारकडवाडीतील नागरिकांची इव्हीएम विरोधातील भूमिका योग्यच असल्याचे सांगितले. ढोबळे म्हणाले की, सगळ्या जगाने इव्हीएम यंत्रणा टाकून दिली आहे, ज्या देशात ही सिस्टीम तयार करण्यात आली त्या जपानमध्येही ती वापरली जात नाही. अमेरिका सारखा देशही बॅलेट पेपरवर निवडणुका घेतो अनेक देशांनी ही यंत्रणा टाकावू असल्याचे जाहीर केलेले असताना आपल्या देशात मात्र इव्हीएमवरच निवडणुका घेण्याचा आग्रह धरला जात आहे. छोटी राज्ये विरोधकांना सोडायची आणि महाराष्ट्रा सारखी मोठी राज्ये ताब्यात घेण्यासाठी निवडणुकीत इव्हीएमचा आधार घ्यायचा ही पद्धत सत्ताधार्यांनी अवलंबली आहे. इव्हीएम बाबत अनेक पुरावेही समोर आले आहेत. अशा स्थितीत राज्यात ते ही आपल्या सोलापुरातील मारकडवाडी सारख्या गावाने इव्हीएम विरोधात घेतलेली भूमिका खरोखरच कौतुकास्पद वाटते. आपला हा लढा असाच चालू ठेवायचा आहे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पाठीशी कायम आहेत, असेही ढोबळे यांनी स्पष्ट सांगितले.
सहकारी संस्थांच्या निवडणुकाही इव्हीएमवर घेणार का?
राज्यात 28 हजार 837 सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रतीक्षेत आहेत. निवडणूक प्रक्रियेला आतापर्यंत तीन वेळा स्थगिती देण्यात आलेली आहे. मागील आठ महिन्यांहून सुमारे 28 हजार 837 संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. विधानसभा निवडणुका झाल्याने या संस्थांच्या निवडणुका होतील त्याही आता इव्हीएम मशीनवरच घेणार का, असा टोलाही माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी लगावला आहे.