Advertisement
मुंबई : परळी वैजनाथमध्ये झालेल्या ब्रह्म ऐक्य परिषदेत पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्या परिषदेमध्ये पंकजा यांनी पंचागकर्ते मोहन दाते यांचा सत्कार केला होता. त्यावेळी ' पंचागकर्ते दाते यांना पुरस्कार प्रदान करता आला, हे माझे भाग्य आहे. मला वाटते की आता माझे पंचांग नीट होईल' असं वक्तव्य पंकजा यांनी केलं होतं.
पंकजा यांचं हे वाक्य 2024 हे वर्ष संपताना खरं ठरलंय. पंकजा मुंडेंसाठी 2024 हे वर्ष चढउताराचं होतं. यावर्षी बीड लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपानं उमेदवारी दिली होती. त्या लोकसभा निवडणुकीत पंकजा यांना निसटता पराभव सहन करावा लागला. मराठा नेते मनोज जरांगे फॅक्टर यांनी विरोध केल्यामुळेच पंकजा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.
या पराभवानंतरही भाजपाचा पंकजांवरील विश्वास कायम होता. लोकसभा निवडणुकीनंतर लगेच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत त्यांना पक्षानं उमेदवारी दिली. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात झालेल्या प्रत्येक विधानपरिषद निवडणुकीपूर्वी पंकजा यांच्या नावाची चर्चा होत होती, पण त्यांना नेहमी उमेदवारीनं हुलकावणी दिली. अखेर यंदा त्यांना भाजपानं उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत विजयी होऊन पंकजा आमदार झाल्या. मंत्रिमंडळात पंकजा यांचा समावेश ही झाला आहे. त्यानंतर 'मला वाटते की आता माझे पंचांग नीट होईल',' हे पंकजा मुंडे यांचे वाक्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.