Advertisement
बीड ; मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली, या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र अजूनही काही आरोपी फरार आहेत. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं असून, आज या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीयांकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. यामध्ये आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या मोर्चामध्ये बोलताना नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. वाल्मिकी कराड यांना अटक करावी, जोपर्यंत या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. राज्याला सक्षम मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मिळाले आहेत. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न नाही, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला येत्या 26 जानेवारीपर्यंत नवा पालकमंत्री मिळेल असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.