Advertisement
मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी झाला. मंत्रिमंडळ विस्तारही झाला तरी अजूनही कोणत्याच मंत्र्याला खातं मिळालं नाही. त्यामुळं मंत्रिमंडळात तब्बल 41 जण बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यातच अजित पवारांना अर्थखातं मिळणार नाही, अशी कुणकुण लागली होती. या माहितीमुळंच अजित पवारांचा आजार बळावल्याची चर्चा सुरु झाली. खातेवाटप न झाल्यानं पवारांचा आजार बळावल्याची चर्चा होती. मंगळवारी रात्री खातेवाटपाचा तिढा सुटल्यान अजितदादा खडखडीत बरे झाले आणि त्यांनी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागही घेतला असल्याची चर्चा आहे.
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आजारपण चर्चेचा विषय ठरला होता. अधिवेशन सुरु असताना अजित पवार दोन दिवस कुणालाही भेटले नाही. राज्यपालाच्या चहापानालाही अजित पवारांनी दांडी मारली होती. खातेवाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. खातेवाटप अधिकृतरित्या जाहीर झालं नसलं तरी अजित पवारांच्या तब्येतील लगेचच सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांनी तातडीनं भेटीगाठींना सुरुवात केली. शिवाय ते विधिमंडळाच्या कामकाजातही सहभागी झाले होते.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर दोन दिवसांनंतर खातेवाटप होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. पण दोन दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतरही खातेवाटप झालेलं नाही. मनासारखं खातं मिळालं नाही तर अजितदादा पुन्हा आजारी पडणार अशी कुजबूज सुरु झालीय.