Advertisement
मोठा बदल होणार ; नावं अनेक चर्चेत
मुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यानतंर काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच प्रदेशाध्यक्ष बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची चर्चा रंगली आहे. यात विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सुनील केदार यांच्यासह इतर काही नावांची चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे नाना पटोले यांची गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. तर मुख्य प्रतोद पदी अमित देशमुख यांची निवड होणार असल्याचे बोललं जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. मात्र अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. त्यातच नाना पटोले यांनी विधिमंडळात गटनेता व्हायचे असल्याने प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. यामुळे सध्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहताना दिसत आहे.