Advertisement
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा भांडुप येथील मैत्री बंगल्याची काही इसमांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राऊत यांच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत हे सत्ताधारी पक्षांवर दररोज निशाणा साधतात. राऊत हे महाविकास आघाडीतील ताकदवान नेते आहेत. पण त्यांच्या घराचीच आता रेकी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्याबाहेर आज सकाळी दोन जण रेकी करण्यासाठी आल्याची माहिती आहे. रेकी करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाले आहेत. तसेच संजय राऊत यांच्या बंगल्याबाहेर मोबाईल कॅमेरे लावून रेकी करण्यात आल्याचादेखील धक्कादायक दावा करण्यात आला आहे. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी याबाबत पुरावे स्पष्ट केले आहेत. तर विधानसभेत ठाकरे गटाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांनी सभागृहात विषय मांडला आहे. या दोन्ही नेत्यांनी दिलेल्या माहितीनंतर आता संजय राऊत यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
संजय राऊत यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीनंतर ते मातोश्री बाहेर आले. यावेळी प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे बघा माझ्याकडे त्याची माहिती आहे. ‘सामना’ कार्यालयाची रेकी होते. माझ्या घराची रेकी होते आणि दिल्लीतील घराचीदेखील रेकी होत असल्याचं माझ्या लक्षात आलं आहे. ते आता रेकॉर्डवर आहे. पोलीस अधिकारी तपास करत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलले आहेत. आता विधानसभेत भास्कर जाधव यांनी माहिती दिली आहे, असं संजय राऊत म्हणाले.