Advertisement
सांगली : महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, नेते मंडळींनी विधानसभा निवडणुकीत मनापासून काम केले. इव्हीएम मशीनबाबत शंका आहेच. पण, मतदारांचा कौल मान्य करून नियोजनामध्ये आपलीच काहीतरी गडबड झाली. यशाचे सर्व धनी असतात, परंतु अपयशाचे धनी कोणी नसते. अपयश पचवायची ताकद सर्वांमध्ये असावी लागते, आघाडीतील सर्व घटक पक्षातील सहकाऱ्यांना पुढे घेऊन जात असताना बांधलेली वज्रमूठ कायम ठेवून होणार्या सर्व निवडणुका लढवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेध उपाध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी लक्ष्मणराव ढोबळे बोलत होते. ते म्हणाले की, या पुढील काळात सर्वांसाठी 24 तास कार्यरत राहणार आहे. निवडणुकीबाबत आपल्याला अधिक चर्चा करायची नाही. सर्वांनी मनापासून काम केले आहे. पुढील सर्व निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. मतमोजणीनंतर दुसर्या दिवसापासूनच आम्ही सर्वजण लोकांच्या सुख दुःखात जात आहोत, शरद पवार साहेबांनी निवडुन आलेले तसेच पराभूत आमदारांशीही चर्चा केली आहे. पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आता सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचे आहे. निवडणुकीत बांधलेली वज्रमूठ महाविकास आघाडीला सोबत घेऊन लढायची आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत मतदारांनी जो विश्वास आमच्यावर टाकला, यापुढील काळातही तो विश्वास टिकवण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. पुढील काळात महाविकास आघाडीची सत्ता येणार, असा विश्वास आहे.