Advertisement
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी घडामोडीला वेग
मुंबई : मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी मुंबईत देखील घडामोडींना वेग आला आहे. वर्षा निवासस्थानाच्या बाजूला असलेल्या मुक्तगिरी या बंगल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वास्तव्य करणार आहेत. उदय सामंत यांचं या बंगल्यात वास्तव होतं. आता हा बंगला एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी बंगल्यातील आपलं सगळं सामान बाहेर काढल्याची माहिती समोर येत आहे. आता या बंगल्याचा ताबा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सामान हे मुक्तागिरी बंगल्यामध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नंदनवन बंगल्याची डागडुजी सुरू असल्याने, एकनाथ शिंदे मुक्तागिरी बंगल्यामध्ये वास्तव्य करणार आहेत, काम पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा नंदनवन या त्यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे बंगले आजुबाजूलाच असल्याने भविष्यात वर्षा निवासस्थान आणि मुक्तागिरी बंगला राजकारणाचा हॉटस्पॉट होऊ शकतात अशी देखील चर्चा सुरू आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, नवे मंत्री नागपुरात शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात 34 ते 35 मंत्री शपथ घेण्याची शक्यात आहे. ज्यामध्ये भाजपचे 17, शिवसेना शिंदे गटाचे 10 तर अजित पवार गटाच्या 7 जणांचा समावेश आहे, अशी माहिती समोर येत आहे.