Advertisement
बुलढाणा येथील जिल्हास्तरीय मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
बुलढाणा : लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळविल्यानंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला समाधानकारक यश मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष ज्येष्ठ शरद पवार यांनी राज्यभरातील विजेते आणि पराभूत आमदारांशी चर्चा केली आहे. विरोधकांच्या विजयामध्ये ईव्हीएम मशीनचा वाटा अधिक असल्याचेही समोर येत आहे. त्यानुसार अधिकाधिक पुरावे आपल्याकडे आले तर निवडणूक आयोग तसेच न्यायालयाचे दार ठोठावता येईल. सध्या, आपण आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागले पहिजे. आपल्या पाठिशी पवार साहेब आहेत, हे विसरू नका, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले, विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या विश्वासू नेत्यांना आगामी काळासाठी नव्याने मोट बांधण्याची जबाबदारी दिली आहे, त्यानुसार लक्ष्मणराव ढोबळे यांच्या बुलढाणा जिल्हा दाैऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीनी ढोबळे यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या जिल्हास्तरीय मेळाव्यात लक्ष्मणराव ढोबळे बोलत होते.
यावेळी रेखाताई खेडकर, नरूभाऊ खेडकर, जयश्रीताई शेळके, जालिंदर बुधवत, हर्षवर्धनजी सपकाळ, नेरेशभाऊ शेळके, डी.एस.लहाने सर, गणेशसिंग रजपूत, बी.टी.जाधव, पी.एम.जाधव, सुनिल तायडे, लखन गाडेकर, दिपक रिठे, सुनिल सपकाळ सर, गजानन मामलकर, सतिष महेंद्रे, दत्ता काकस, जाकिर कुरेशी, प्रमिलाताई गवई, साहेबराव सरदार, संजय राठोड, शिवाजी गवई यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकार तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढोबळे म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्याचं मागासलेपण दूर व्हावं म्हणून इथं कोणतीही विकासकामं झालेली नाहीत. एकेकाळी पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून प्रसिद्ध असलेला हा जिल्हा आज शेतकरी आत्महत्यामध्ये राज्यातला क्रमांक दोनचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही ओळख पुसण्यासाठी आणि बुलढाणा शहरातील नागरिकांना चांगले रस्ते, मुबलक पाणी, अखंडित वीज, चागल्या शैक्षणिक, आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी येत्या काळात शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेची मजबूत मोट बांधावी लागेल. प्रत्येकाला कंबर कसून काम कटरावे लागेल. या जगात अशक्य असं काही नाही. आपण सर्व मिळून बदल घडवू शकतो. त्यासाठी एकजुटीनं लढावं लागेल.
सोयाबीन आणि कापूस हे इथलं मुख्य पीक आहे. शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार आहे. पण, पिकलं चांगला भाव, शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज व्हावं म्हणून लोकप्रतिनिधी पोटतिडकीनं काम करत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत नाहीत. त्यामुळे इथला शेतकरी देशोधडीला लागला आहे. इथं एमआयडीसी नाही, कारखाने नाहीत. हाताला काम नसल्यामुळे इथल्या तरुणांना पोट भरण्यासाठी संभाजीनगर, पुणे, मुंबई यासारख्या शहरात गाव सोडून जावे लागत आहे. उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे अनेकांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत आहे. अनेक शहरं आज स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना बुलढाणा मात्र दिवसेंदिवस भकास होत चाले आहे. हे चित्र आपल्याला बदलायचे आहे. त्यासाठी पक्षाच्या माध्यमातून येत्या काळात आपल्याला रस्त्यावर उतरुन लोकशाही मागनि लढावे लागेल, असेही ढोबळे यांनी स्पष्ट केले.
बुलढाणा जिल्ह्या 'विदर्भाचे प्रवेशद्वार'
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून विदर्भात येण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातूनच यावे लागते म्हणून बुलढाणा जिल्ह्याला 'विदर्भाचे प्रवेशद्वार' म्हटले जाते. जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते 13 तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. विदर्भातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा राहिलेल्या बुलढाण्यात विधानसभेचे एकूण सात मतदारसंघ आहेत. या सात मतदारसंघांमध्ये मलकापूर, मेहकर, बुलढाणा, अमळनेर, चिखली, जळगाव जामोद आणि सिंदखेड राजा या मतदारसंघांचा समावेश आहे.