Advertisement
मुंबई :राज्यात सरकार स्थापन कऱण्यासाठी राज्यपालांनी महायुतीला निमंत्रण दिलं आहे. दरम्यान राज्यपालांची भेट घेतल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी यावेळी आपल्या भूमिका मांडल्या. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरुन एकनाथ शिंदे अद्यापही मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी तयार नसल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळपर्यंत तुम्हाला उत्तर मिळेल असं सांगितलं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी मी तर शपथ घेतोय असं सांगितल्यानंतर एकच हशा पिकला.
"मी एकनाथ शिंदे यांना भेटून शिवसेनेच्या वतीने त्यांना मंत्रिमडंळात राहण्याची विनंती केली आहे. शिवसेना, महायुतीच्या सर्व आमदारांची तशी इच्छा आहे. त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसंच संध्याकाळी किती लोकांचा शपथविधी होईल याची माहिती दिली जाईल असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद हे आमत्यासाठी फक्त तांत्रिक व्यवस्था आहे असंही ते म्हणाले.
दरम्यान, प्रसारमाध्यमांनी एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याबद्दल विचारलं असता त्यांनी संध्याकाळपर्यंत वाटा पाहा असं सांगितलं. "संध्याकाळी सांगतो असं म्हटलं आहे ना. देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांचे, महायुतीच्या आमदारांचे आभार मानतो," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.