Advertisement
मुंबई : कपाळावर लाल कुंकू, अंगावर साधा ड्रेस आणि सोबत आई-भाऊ... मुंबई मराठी पत्रकार संघात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी भरल्या डोळ्यांनी आपली बाजू मांडली. मागचे दीड महिने मी शांत राहिले पण आज बोलण्याची वेळ आली, असं त्या म्हणाल्या. आपल्यावर ही वेळ का आली? याबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिले.
साधारण दीड महिन्यांपूर्वी करुणा मुंडे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केला होता. करुणा यांनी आपल्या लाईव्हमध्ये धनंजय मुंडेंसोबत काही महिलांची नावे जोडली. यामुळे प्राजक्ता माळीला त्रास सहन करावा लागला. तिच्य प्रत्येक पोस्टवर ट्रोलिंग सुरु झाली. तरीही मी शांत राहिले असे प्राजक्ता यांनी सांगितले. या प्रकारानंतर माझ्या लीगल टीमने करुणा मुंडे यांना नोटीस पाठवल्याचे प्राजक्ताने सांगितले. एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या पाठीशी उभे राहायला हवे. तिच्यावर लांछन टाकू नये.तुम्हीदेखील एक महिला आहात, त्यामुळे महिलांना कशाप्रकारे बदनामीला सामोरे जावे लागते हे तुम्हाला चांगलेच माहिती असेल. त्यामुळे एका महिलेची अशाप्रकारे बदनामी करु नका असे आवाहन प्राजक्ता माळी यांनी करुणा मुंडे यांना केले.
पत्रकार परिषदेत आई आणि भाऊ प्राजक्ता माळी यांच्यासोबत होता. माझ्यावर होणाऱ्या ट्रोलिंगचा घरच्यांवर खूप परिणाम झाला. माझ्या भावाने सोशल मीडियात येणाऱ्या कमेंट्स वाचून त्याचं अकाऊंट बंद केल्याचे त्यांनी सांगितले. माझं कुटुंब, मित्र परिवार, महाराष्ट्रातील जनता माझ्यासोबत आहे. कोणीही माझ्यावर शंकेने पाहिले नाही. धीराने सामोरे जा, असं सर्वाने सांगितले. कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वत:च्या कर्तुत्वावर नाव कमावणाऱ्या महिलांना अशाप्रकारच्या लांछनांना सामोरे जावे लागते, असे प्राजक्ता माळी यांनी यावेळी म्हटले. वारंवार होणाऱ्या अशा ट्रोलिंगमुळे पीडित व्यक्ती नैराश्येत जाऊ शकते. तिच्या मनात आत्महत्या करण्यासारखे विचार येऊ शकतात. त्यामुळे हे वेळीच रोखायला हवं असं त्यांनी यावेळी म्हटलं.