Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर शिवसेना (ठाकरे) आणि भाजपमधील दुरावा कमी होत असल्याची चर्चा आहे.उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता ठाकरेंच्या आमदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ठाकरे फडणवीसांमधील दरी कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेना (ठाकरे)चे वांद्रे पूर्वचे आमदार वरूण सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या मतदारसंघात सरकारी वसाहतीतील कर्मचा-यांची निवासस्थानं आहेत. त्या प्रश्नासंदर्भात सरदेसाईंनी फडणवीसांशी चर्चा केली. त्यानंतर विधान परिषदेचे शिवसेना (ठाकरे)चे आमदार अनिल परब यांनीही सरकारी कर्मचा-यांच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. इतकचं नव्हे तर शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुंबईतील सातशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा, या मागणीचं निवेदन दिलं. विशेष म्हणजे विधान परिषद सभापती निवडणुकीतही नीलम गो-हे यांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित शिवसेना (ठाकरे) उपस्थित केला होता. तसंच भाजपचे राम शिंदे सभापती व्हावेत, यासाठी त्यांनी अप्रत्यक्ष मदतही केली होती.
शिंदेंच्या पोटात गोळा आला
एकनाथ शिंदे हे अडिच ते तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंच्याच पक्षात होते.. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शिंदेंमध्ये एवढे मतभेद निर्माण झालेत की ठाकरेंच्या पक्षाला फडणवीस जवळचे वाटू लागलेत. राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोण कुणाचा कायमचा शत्रूही नसतो. जर उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट घेऊ शकतात तर त्यांच्या पक्षांच्या आमदारांनी फडणवीसांची भेट घेतल्यास त्यात वावगे ते काय? असा सवाल विचारला जाऊ लागलाय. पण ठाकरेंच्या आमदारांच्या वाढलेल्या या फेऱ्यांमुळे शिंदेंच्या आमदारांच्या मात्र पोटात गोळा आला