Advertisement
प्रा. लक्ष्मण ढोबळे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या लेखणीतून
वर्ष १९५६.... गोवा मुक्ती संग्राम सत्याग्रहाचं वारं वाहत होतं. त्याच्या समर्थनासाठी एक शाळकरी मुलगा शालेय मित्रांची मोट बांधत होता, हेच त्या मुलाचं राजकारणातलं पहिलं पाऊल. आज तोच मुलगा ८४ वर्षांचा आहे. कोणीही त्याच्या पावलांना रोखू शकलेलं नाही. आजही तो दिमाखाने, विश्वासानं पुढे चालत आहे. चालत राहील. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नाही तर ते आहेत राजकारणातील विश्वविद्यापीठ शरदचंद्रजी पवार... म्हणजेच आपले साहेब !
देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या सहा दशकांपासून शरद पवार नावाचा दबदबा आहे. मराठी माणसांच्या कल्याणासाठी राजकारणातील सात्विकता जपत त्यांनी मराठी मुलखाचे वैभव वाढवले. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाशी श्रद्धा बाळगत गनिमीकाव्याने दिल्लीश्वरांना हादरे दिले. ६४ वर्ष मराठी मातीच्या शिवारात बजीराजाच्या हिताचे आणि चांगुलपणाचे काम केले. मायभूमीच्या संस्काराचे स्मरण करीत संसदीय राजकारणात ६० वर्ष मराठी बाणा जपत वैभवाचा आणि मानसन्मानाचा काळ गाजविला.
जिजाऊंचे स्मरण करीत शारदेच्या मातृत्वाचा दरबारी थाट जपत बारामतीच्या नेतृत्वाने राज्यातील १२ मताचा पक्ष संघटित केला. संसदीय पावित्र्य जपताना हिंदवी स्वराज्याच्या अठरापगड जातीला न्याय दिला. ग्रामीण भागाचा सहकारातून उद्धार केला. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत साखर उद्योगाला, महाराष्ट्राची इब्रत वाढविणाऱ्या उद्योगपतींना, पिक्यान्पिढ्याच्या कुलगुरूंना शिक्षणाचे वैभव राखत आणि बहुजनांचे वात्सल्य जपत महाराष्ट्र सांभाळला, वाढविला. यासाठीच ८४ वर्षाच्या या योद्धयाने शिवरायांच्या आदर्श राज्याची परंपरा जतन केली. वसंतराव नाईकांपासून ते वसंतदादांपर्यंतची परंपरा मोठ्या हिमतीने जपत सत्तेत आणि सत्तेबाहेर राजकारणातील संघर्षांची लढाई केली.
शरदचंद्रजी पवार साहेब यांनी चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविले. मराठवाडा विद्यापीठ नामांतरासारखा संवेदनशील मुद्दा असो. मुंबई बॉम्बस्फोटासारखी काळजाचा थरकाप उडवणारी घटना असो किंवा किल्लारीचा महालयंकारी भूकंप शरदचंद्रजी पवार यांचे नेतृत्व या अग्निपरीक्षांमुळे अधिक तेजस्वी झाले. महिला धोरण असो, महिलांना माहेरच्या संपत्तीत वाटा असो, अगर महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय असो. सामाजिक न्यायाचे धाडसाचे निर्णय घेतले ते पवार साहेबांनी. महिलांना सैन्य दलात प्रवेश देण्याचे क्रांतिकारक पाऊल उचलले ते साहेबांनी, आज सेनेच्या तिन्ही दलात असणारा महिलांचा वावरही शरद पवार साहेबांची देणं आहे. मंडल आयोगाच्या शिफारशी सर्वप्रथम अमलात आणून सामाजिक न्यायाचे पहिले पाऊल टाकले ते साहेबांनी, स्त्री-पुरुष भेद मुळासकट उपसून टाकत सर्व जातीधर्म आणि अठरापगड जातीच्या लोकांसाठी व्यापक काम करणारे एकमेव राजकारणी ठरले ते पवार साहेब, कृषिमंत्री पदावर असताना भारतातील शेतकऱ्यांनी या भूमिपुत्राच्या नेतृत्वाखाली अन्नधान्य उत्पादनातील सगळे विक्रम पार केले. सलग ६४ वर्षे या लोकनेत्यानं जनसेवेचा वसा जोपासत विकासाचे पर्वत रचले.
यश... अपयश... संकटं... आव्हानं काहीही असो, हा नेता कधी विचलित होत नाही. संयम आणि सहनशीलता हे या नेत्याचे गुण आहेत. हा लोकनेता आहे, भूमिपूत्र आहे, राज्यकर्ता आहे, शेतकरी आहे, आपल्या विरोधकांचा देखील मित्र आहे. दिलदार आहे. नाविन्याचे त्यांना आकर्षण आहे म्हणूनच हा नेता आकाही तरुण आहे.
शेतकरी, कामगार, मजूर, शिक्षक, मध्यमवर्गीय, दलित, मुस्लिम, मागासवर्गीय, उद्योजक आणि सर्व पक्षातील राजकारणी या सर्वांना शरदचंद्र पवार साहेब आपले वाटतात, जवळचे वाटतात, हेच त्यांच्या आजवरच्या जगण्याचे फलित आहे. त्यांचा राजकीय प्रवास अनेक नाट्यमय घडामोडींनी अनेक आव्हानांनीआणि विक्रमांनी सजलेला आहे. आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीने भारतीय राजकारणाची ६० वर्षे ऐतिहासिक करणारे शरदचंद्र पवार साहेब ८४ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. यानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य लाभी व ते दीर्घायुषी होवोत म्हणून आम्हा सामान्य माणसांच्या लाख लाख शुभेच्छा !