Advertisement
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दोघांमधील ही पहिली भेट ठरली असून. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल अदानी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी गौतम अदानी हे फडणवीसांची भेट घेण्यासाठी फडणवीसांचं निवासस्थान असलेल्या 'सागर' बंगल्यावर पोहचले होते.
गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमधील कथित हितसंबंधांचा आरोप करत एकीकडे काँग्रेसने लोकसभेतील हिवाळी अधिवेशनात रान उठवलेलं असतानाच दुसरीकडे अदानींनी अशाप्रकारे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणं हे महत्त्वाचं मानलं जात आहे. दोघांमध्ये या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. मात्र एकीकडे विरोधक सातत्याने अदानी आणि अंबानींच्या नावाने सरकारला लक्ष्य करत असतानाच दुसरीकडे देशातील सर्वात श्रीमंत राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थेट अदानी त्यांच्या सरकारी बंगल्यावर पोहचल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
धारावी प्रकल्प कनेक्शन?
मुंबईमधील अनेक महत्त्वाचे प्रकल्प हे अदानी समुहाच्या माध्यमातून पुर्णत्वास जातील अशी दाट शक्यता आहे. यापैकी प्रामुख्याने धारावी विकास प्रकल्प हा अदानींच्या माध्यमातून राबवला जाणार असून हा प्रकल्प शेकडो कोटींची जमीन अदानींच्या घशात घालण्यासाठी राबवला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी खास करुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं वारंवार केले आहेत. धारावीमधील पुर्नर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील मूळ मुंबईकरांना बाहेर विस्थापित होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी प्रचारादरम्यान म्हटलं होतं. आपली सत्ता आल्यानंतर आधी धारावी प्रकल्प रद्द केला जाईल असंही शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळेच हा प्रकल्प आणि पर्यायाने अदानी विधानसभा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरले होते.