#

Advertisement

Sunday, December 1, 2024, December 01, 2024 WIB
Last Updated 2024-12-01T08:06:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विठुरायाचा निर्विकार भाव आपल्यामध्ये आला पाहिजे : ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील महाराज

Advertisement

स्व.अनुराधा ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित किर्तन सोहळ्यात प्रतिपादन

मंगळवेढा : संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले. वारकरी परंपरेच्या माध्यमातून सर्व समाजाला दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न होत आले आहेत. दुःखाला जर नाहीसे करायचे असेल तर भगवंताला आपलेसे करणे गरजेचे आहे. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत असताना विठुरायाचा निर्विकार भाव आपल्यामध्ये आला पाहिजे, असे प्रतिपादन ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील महाराज यांनी स्व.अनुराधा ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित किर्तन सोहळ्यामध्ये मांडले.
स्व अनुराधा ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित "आई मायेचा जागर" किर्तन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे होते.
ह.भ.प पुरुषोत्तम पाटील महाराज म्हणाले, वारकरी संप्रदायाचा पाया माउलींनी रचला. त्यावर तुकोबारायांनी कळस चढवला. कीर्तन हे अमृतानंद आहे. प्रत्येकाला सुख हवे आहे. किर्ती हवी आहे. सुख मिळण्याचे साधन नामस्मरण आहे. पण, आपण ते मानत नाही. जिवाला अनुकूल वेदना झाली की त्याला आपण सुख म्हणतो आणि प्रतिकूल वेदनेला दुःख म्हणतो, पण, संतांनी सुखाची व्याख्या नामस्मरण सांगितली आहे. त्यासाठी आपुला तो एक करून घ्यावा, असे तुकोबारायांनी म्हटले आहे.
शिवरायांच्या काळात आई-बहिणी सुरक्षित होत्या. मात्र, आज प्रत्येक दिवशी भरदिवसा आई- बहिणीवर अत्याचार होत असल्याच्या निंदनीय घटना दिवसेंदिवस घडत आहेत. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. यासाठी आज देशात सर्वत्र पुन्हा एकदा छत्रपती शासन आणण्याची गरज आहे. आजच्या तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे तरुणांची पिढी वाया चालली आहे. आज तरुणांनी जागे होण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या अंगातील मरगळ झटकून शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजकार्य करण्याची गरज आहे. कारण आज तरुण हा देशाचा कणा आहे. यासाठी तरुणांनी खंबीरपणे लढणे गरजेचे आहे. तरुणांनी बापाचे दोन-चार एकर शेत विकून नोकरीला लागण्यापेक्षा व्यवसायात उतरुन चार-पाच एकर शेत घेण्याची हिंमत ठेवावी. जेणेकरून जन्मदात्याला देखील याचा अभिमान वाटेल. छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. आपण शिवरायांच्या मातृभूमीत जन्म घेतला आहे. यासाठी आपण शिवरायांचे विचार अमलात आणून जीवन जगले पाहिजे, प्रत्येकाने समाजातील आई-बहिणींचा आदर सन्मान केला पाहिजे, असा सल्ला देखील महाराजांनी दिला.
आई माझी मायेचा सागर गीतवेळी उपस्थित मंत्रमुग्ध.स्व. अनुराधा ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त किर्तन कार्यक्रमाचे आयोजन हे त्यांचे पुण्यकर्मच आहे. मंगळवेढा संत भूमीत चोखामेळा यांचे मोठे मंदिर उभारण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच वारकरी परंपरेतील संतांचा अभंगांच्या आधार घेऊन चालू परिस्थितीवर भाष्य करत जीवनाला आकार देण्यासाठी, आयुष्याला आनंदी करण्यासाठी भगवंताचे मनापासून व प्रामाणिकपणे नामस्मरण करण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, आ. अभिजीत पाटील, आ.डॉ. बाबासाहेब देशमुख, डी.सी.सी. बँकेचे माजी व्हा. चेअरमन बबनराव आवताडे, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा, व्हा. चेअरमन रामचंद्र जगताप, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत, धनश्री पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रा. शोभा काळुंगे, माजी नगराध्यक्षा अरूणा माळी, कै. भारतनाना भालके फौंडेशनच्या संस्थापिका प्रणिता भालके, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, सावली फाऊंडेशनच्या अॅड. कोमलताई साळुंखे- ढोबळे, अजय साळुंखे, मुझ्झफर काझी, किसनराव गवळी, चंद्रशेखर कोंडूभैरी, स प्रथमेश पाटील, आळंदीचे ह.भ.प. केशव महाराज पवार, दिगंबर भगरे, ज्ञानेश्वर व भगरे, दत्ता भोसले, जमीर सुतार, ऋतुराज व बिले, लहू ढगे, अजय अदाटे, हजरतच काझी, यांचेसह विविध पक्षाचे अध्यक्ष, व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बहुजन व रयत परिषद व सावली फाऊंडेशन, शाहू परिवाराचे सर्व सदस्य, भाविक व नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक व सूत्रसंचालन प्रा. विनायक कलुबर्मे यांनी केले.