Advertisement
पुणे : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सव्वाशेपेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवल्यानंतरही राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकाही जागी विजय मिळवता आलेला नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी दोन दिवस पुणे दौऱ्यावर विविध पदाधिकाऱ्यांची बुधवारी रात्री बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी झालेल्या बैठकीमध्ये काय घडलं यासंदर्भातील तपशीलही समोर आला आहे. या बैठकीमध्ये मुंबई वगळता राज्यभरातून उभ्या केलेल्या पराभूत उमेदवारांनी हजेरी लावली होती. या बैठकीत काय झालं याबद्दलची माहिती मनसेचे पक्ष नेते बाबू वागसकर यांनी सारमाध्यमांशी बोलताना सांगितला. "मनसेच्या बैठकीत ईव्हीएमविषयी सर्वच उमेदवाराकडून शंका उपस्थित करण्यात आली," असं वागसकर म्हणाले. एवढ्यावरच न थांबता या शंका ऐकून राज ठाकरेंनी काय निर्देश दिले याबद्दलही वागसकर यांनी सांगितलं. "उमेदवारांनी शंका उपस्थित केल्यानंतर त्यावर उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांनी आवश्यक पुरावे गोळा करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी केल्या आहेत," असं वागसकर म्हणाले. "पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांचे मत ऐकून घेतल्यानंतर पुढील तीन-चार दिवसात राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत," असंही वागसकर यांनी सांगितलं.