Advertisement
सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्याने व तेथील उमेदवारांनी अर्ज माघारी न घेतल्याने येथे मविआमधीलच उमेदवारांची लढत रंगणार आहे. दुसरीकडे सोलापूर दक्षिण मतदारसंघात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. सोलापूर दक्षिणमध्ये दिलीप माने हेच काँग्रेसचे उमेदवार असतील असं सांगून देखील काँग्रेस त्यांना एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे, दिलीप मानेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशी दिलीप माने व त्यांच्या मुलाने अर्ज माघारी घेतले आहेत.
दिलीप माने यांना काँग्रेसचा एबी फॉर्म काही मिळाला नाही. त्यामुळे माने यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला होता. दिलीप माने यांच्यासह त्यांच्या मुलानेही अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्यादिवशी दिलीप मानेंसह त्यांच्या मुलानेही अर्ज माघारी घेतला आहे.
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार दिलीप माने आणि त्यांच्या मुलगा पृथ्वीराज माने दोघांचे अर्ज माघारी घेतले आहेत. मात्र, काँग्रेसचे दुसरे बंडखोर धर्मराज काडादी यांचा अर्ज अद्यापही कायम आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, धर्मराज काडादी अपक्ष आहेत. या दोन्ही नेत्यांना माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे आव्हान असणार आहे. \
सोलापूर शहर उत्तरमधून शोभा बनशेट्टींची बंडखोरी कायम
शहर उत्तरमधून भाजपच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांची बंडखोरी कायम आहे. भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर शोभा बनशेट्टी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शोभा बनशेट्टी या भाजपच्या माजी महापौर असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. शोभा बनशेट्टी यांनी विरोधात उमेदवारी कायम ठेवल्याने आमदार विजयकुमार देशमुखांची डोकेदुखी वाढल्याचं दिसून येतं.