#

Advertisement

Monday, November 25, 2024, November 25, 2024 WIB
Last Updated 2024-11-25T11:40:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजपाशी जवळीक भोवली !

Advertisement

पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंना स्पष्टच सांगितलं 

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती एकही जागा लागली नाही. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असं घडलं आहे की त्यांचा एकही आमदार विधानसभेमध्ये नसणार. या पराभवानंतर राज ठाकरेंनी अवघ्या तीन शब्दांचं, 'अविश्वसनीय, तुर्तास एवढेच...' अशी पोस्ट केली होती. यानंतर राज ठाकरेंनी आज पराभूत आमदारांबरोबर पराभवाच्या कारणांची माहिती घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबरची जवळीक घातक ठरल्याचं मत पराभूत उमेदवारांनी नोंदवल्याची माहिती समोर येत आहे. 
राज ठाकरेंनी मुंबईमधील निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलं. या बैठकीमध्ये ईव्हीएमसंदर्भातील काही तक्रारी पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंकडे केल्या. तसेच भाजपाबरोबरची जवळीक आपल्याला फायद्याची ठरलेली नाहीये, असं पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंना सांगितलं आहे. राज ठाकरेंनी मुंबई आणि उपनगरांमधून एकूण 42 उमेदवार उभे केले होते. मात्र एकही उमेदवार जिंकून आला नाही. इतकेच काय तर स्वत: राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा दादर-माहिम मतदारसंघातून तिसऱ्या स्थानी राहत पराभूत झाले. पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही.
 मनसेच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत होता, सभांना गर्दी होत होती मग त्याचं रुपांतर मतांमध्ये का झालं नाही? यावर या बैठकीत चर्चा झाली. किमान चार ते पाच जण निवडून येतील अशी अपेक्षा मनसेला होती. मात्र 138 उमेदवार उभे करुन एकही उमेदवार निवडून आला नाही. यावेळेस बैठकीमधील पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात आली.