Advertisement
मुंबईच्या आझाद मैदानावर होणार सोहळा
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला मोठा विजय मिळाला. यानंतर महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुती सरकारचा शपथविधी कुठे होणार? याबाबत राजशिष्टाचार विभागाकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. मुहायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला आझाद मैदानात पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच शिवाजी पार्क रेसकोर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि राजभवन या पर्यायांची देखील चाचपणी केली जात आहे.राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्कची पाहणी केल्याची माहिती समोर आली होती. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीत कुठलाही अडथळा न येता शिवाजी पार्कवरच शपथविधी करण्यावर भर देण्यात येत होता. तसेच वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामने सुरू असल्याने इतर ठिकाणांचीदेखील चाचपणी सुरू होती. मात्र आता आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.