Advertisement
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून नियुक्ती पत्र जाहीर
मुुंबई : सामाजिक, शैक्षणिक व इतर लोकोपयोगी क्षेत्रामध्ये दिलेले योगदान लक्षात घेत महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्ष पदावर माजी मंत्री, ज्येष्ठ नेते प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी नियुक्ती करण्यात येत आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे.
राजकीय घडामोडीत महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची पुनर्स्थापना करण्यात आली त्यानंतर शरद पवार यांचे नेतृत्त्व मानणारे अनेक मातब्बरांची घरवापसी झाली, त्यामध्ये पवार यांच्या जवळचे मित्र आणि शिष्य अशी ओळख असलेले लक्ष्मणराव ढोबळे यांनीही भाजपला रामराम करीत पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर सोलापुरातील चार तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली, ती पार पाडत असताना भाषण कौशल्यामुळे ढोबळे यांच्या सभा सोलापुर मतदारसंघातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र गाजू लागल्या, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार प्रमुख चेहरा म्हणून ढोबळे यांचे नाव पुढे आले, शदर पवार यांच्या भाषणाची तसेच त्यांच्या चालण्या-बोलण्याची लकब ढोबळे यांच्यात दिसत असल्याने सभांसाठी त्यांची मागणी वाढली त्यातच ढोबळे यांच्या नावाला असलेले सामाजिक तसेच राजकीय वलय लक्षात घेत शरद पवार यांनी लक्ष्मणराव ढोबळे यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदावर नियुक्ती केली असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलेे.
राष्ट्रवादी काँग्रसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून लक्ष्मणराव ढोबळे यांची ओळख आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना ढोबळे यांनी सोलापूरच्या राजकारणात छाप पाडली आहे. मूळचे अक्कलकोटचे असलेले लक्ष्मणराव ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्याने राजकारणात मोठी मजल मारली. त्यांनी आपल्या मवाळ-कणखर वाणीने संपूर्ण महाराष्ट्राला मोहिनी घातली. राजकीय वारसा नसतानादेखील त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. तब्बल 25 वर्षे मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष्मण ढोबळे यांनी काम केले आहे.2004 पर्यंत मंगळवेढ्याचे ते आमदार होते. आता, लक्ष्मणराव ढोबळे यांनी नव्याने राजकीय इनिंग सुरू केली असून त्यात शरद पवार यांनी पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करीत ढोबळे यांचा योग्य सन्मान केला आहे.