Advertisement
पश्चिम महाराष्ट्रातून लक्ष्मणराव ढोबळे यांच्या सभांना मोठी गर्दी
सोलापूर : महाविकास आघाडीने राज्यभरातील सर्वच्या सर्व 288 जागांवर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरविले आहेत. आज, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी संपूर्ण चित्र स्पष्ट झाले असले तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभा सध्या जोरात गाजत आहेत. शरद पवार यांनी आपली "मुलुख मैदान तोफ" प्रचारात उतविल्याने शब्दरूपी तोफगोळ्यांपुढे भल्याभल्यांची पळताभुई थोडी झाली आहे. या तोफेचे नाव आहे सोलापुरातील ज्येष्ठ नेतेे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, शरद पवार यांनी सोपविलेली जबाबदारी ते अगदी निष्ठेने, तडफेने पार पाडत असल्याने त्यांच्या सभा गाजत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांची जबाबदारी सोपविलेली असताना ढोबळे यांच्या सभांची मागणी आता पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार करू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जे जमले नाही ते शरद पवार यांनी हेरले आणि ढोबळे यांच्यावर शब्दांच्या तोफमार्याची जबाबदारी सोपविली. विशेष म्हणजे त्यात ढोबळे हे नेहमी प्रमाणे यशस्वी ठरले आहेत.
भारतीय जनता पक्षात होत असलेल्या घुसमटीतून लक्ष्मणराव ढोबळे यांनी रामराम करीत आपले राजकीय गुरू शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पवार यांनीही झालं गेलं मागे टाकून ढोबळे यांना मित्रत्वाच्या नात्याने जवळ केले. विधानसभा निवडणुकीत ढोबळे यांच्यावर सोलापुरातील चार तालुक्याच्या प्रचाराची जबाबदारी दिली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या अर्ज भरण्याच्या दिवशी झालेल्या सभेतच लक्ष्मणराव ढोबळे यांची तोफ एवढी धडाडली की शरद पवार यांनी ढोबळे यांच्यावर प्रचार यंत्रणेतील मोठे जबाबदारी सोपविली. आज, लक्ष्मणराव ढोबळे यांना सोलापुरातीलच नव्हे तरी पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक मतदार संघातील उमेदवारांकडून सभेची मागणी होत आहे. ढोबळे यांच्या वाणीतून चपखल शब्दांतून समोरील विरोधकांच्या चिंधड्या उडत आहेत.
लक्ष्मणराव ढोबळेे यांनी शरद पवार यांच्या बरोबरचा जुना काळ पाहिला आहे. पवार यांची काँग्रेसमधील कारकिर्द तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उभारणीकरिता घेतलेले कष्ट अनुभवले आहेत त्यामुळे आजच्या राजकीय तोडफोडीच्या राजकारणाला ढोबळे यांच्याकडून अतिशय सडतोड उत्तरे दिली जात आहेत, विरोधी उमेदवाराला नामोहरण करण्याची ताकद त्यांच्यात आहे ढोबळे यांच्याकडे असलेल्या शब्दभांडारात अशी अनेक उदाहरणे, प्रकरणे, घडलेल्या घटना यांचा दारूगोळा ठच्चून भरलेला असल्याने जाहीर सभेत भाषण करण्यासाठी उभे राहिल्यानंतर ढोबळे सभा जिंकत आहेत. शदर पवार यांच्यामुळे आपल्याला पुन्हा सन्मानपूर्वक जागा मिळाली असल्याची भावनाही ते सभेत बोलून दाखवितात. ही तोफ ज्या-ज्या ठिकाणी धडाडणार तेथे विरोधकांचे मनसुबे ढासळणार, असा पक्का विश्वास आता शरद पवार यांच्यासह पक्षातील जाणती मंडळीही व्यक्त करीत आहेत.