Advertisement
महाबळेश्वर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी दरे गावात मुक्काम
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सातत्यानं काही मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची अधिकृत घोषणा झालेली नाही. सत्तास्थापनेआधी खातेवाटपावरून होणारं राजकारणही आता लपून राहिलेलं नाही. त्यातच आता मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या संभाव्य तारखा समोर आलेल्या असतानाच राज्याच्या राजकारणात आणखी एका वादळाचे संकेत मिळत आहेत.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या महाबळेश्वर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी दरे गावात मुक्कामी आहेत. दोन दिवस एकनाथ शिंदे दरे गावात राहणार असून, शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत तिथं ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती आहे. राज्यभरामध्ये मंत्रिमंडळ त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र शिंदे दरेगावात गेल्याने राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणात उधान आलं आहे.
साताऱ्यातील गावात एकनाथ शिंदे विश्रामासाठी गेले असले तरीही तिथून परत आल्यानंतर ते मोठा आणि चांगला निर्णय घेतील असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. 'दोन दिवसाच्या सुट्टीवरुन एकनाथ शिंदे जेव्हा येतात, तेव्हा मोठा आणि चांगला निर्णय जाहीर करतील' असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं.