Advertisement
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदा संदर्भात महत्त्वाची बैठक झाली. भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे महायुतीच्या बैठकीत ठरलं आहे, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणविसांचं नाव जवळपास निश्चित आहे. मात्र, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की नाही, यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
मुंबईत पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही, अशी चर्चा रंगली होती. अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबतच्या दिल्लीतील बैठकीनंतर देखील एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की नाही, यावर अद्याप उत्तर मिळालेलं नाही.
राज्यातल्या नव्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास एकनाथ शिंदेंनी ते स्वीकारावं अशी गळ शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना घातल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंची ठाण्यातली पत्रकार परिषद झाल्यानंतर अनेक नेत्यांनी शिंदेंना तशी विनंती केल्याचं समजतं. काल दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिंदेंची शिवसेनेच्या काही नेत्यांसोबत बैठक झाली. आपण सत्तेत राहूनच सरकार चालवावं असा सूर शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंसोबतच्या बैठकीत आळवला. त्यामुळं शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.