Advertisement
मुंबई : राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होईल की महायुतीचा मुख्यमंत्री असेल याविषयी आता चर्चा रंगली आहे. अजितदादांनी मुख्यमंत्री पदावर कोणतीच आडकाठी न ठेवता थेट भाजपाला, पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काल माध्यमांसमोर येत सस्पेन्सवर एकदाचा पडदा टाकला. भाजपा जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे शिंदे यांनी जाहीर केले. पण भाजपा राज्यात पुन्हा धक्कातंत्र देण्याची चर्चा पण जोरात आहे. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की मराठा उमेदवार देणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 हून अधिकचा मॅजिक फिगर गाठला. त्यात भाजपाला 132 जागांवर यश आले. भाजपा मोठा भाऊ ठरला. त्यानंतर शिंदे सेनेला 57, अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीत असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची संध्याकाळी पाच वाजता बैठक होत आहे. या बैठकीत महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा या तीन एमवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या खलबतं झाली. त्यावेळी सुद्धा हे तीन मुद्दे समोर असल्याचे समजते.
ओबीसींच राजकारण करून आता सत्तेत आलेल्या भाजपासमोर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं का याची चाचपणी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास राज्यातील राजकारणाची दिशा काय असेल. त्याचा राज्यात काय संदेश जाईल याची चर्चा होत आहे. दुसरीकडे बिगर मराठा चेहरा दिल्यास त्याचे काय पडसाद उमटतील याची पण चर्चा होत आहे. ब्राह्मण, मराठा आणि ओबीस या तिघांना वगळून वेगळाच फॅक्टर समोर आणता येण्याची शक्यता पण काही जण वर्तवत आहेत. मोदी आणि शाह हे राज्यात धक्कातंत्र वापरण्याची शक्यता वर्तवत आहेत. मध्यप्रदेशसह राजस्थानमध्ये भाजपाने यापूर्वी वेगळे प्रयोग करून सर्वांनाच धक्का दिला आहे.