#

Advertisement

Monday, November 18, 2024, November 18, 2024 WIB
Last Updated 2024-11-18T11:42:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमच्याकडे शरद पवार साहेब आहेत : ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे

Advertisement

उमेदवार सौ. राणीताई निलेश लंके यांच्या प्रचारार्थ सभा गाजविली 

पारनेर : महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचे पाप काही जणांनी केले. राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्ष फोडला, चिन्ह पळवले. त्यानंतरही ज्येष्ठ नेते शरद पवार डगमगले नाहीत. ते पुन्हा तेवढ्याच ताकदीने उभे राहिले आणि लढत आहेत, विरोधकांकडे सत्ता असली तरी नितीमत्ता नाही. आमच्याकडे शरद पवार साहेब आहेत त्यांच्यासाठीच राणीताई निलेश लंके निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. ही तुमच्या हक्काची माणसं आहेत. तुमच्यासाठी झटली आहेत. माय माऊलींनो पवार साहेब त्यांच्या पाठीशी आहेत. पण, तुमची साथ मोलाची आहे त्यामुळेच बुधवारी ता. २०ला तुतारी चिन्हासमोरील बटण दाबून राणीताई निलेश लंके यांना प्रचंड बुहमताने विजयी करा, असे आवाहन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.

पारनेर, जि. अहिल्यानगर येथून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २२४ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॅाग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. राणीताई निलेश लंके यांच्या प्रचारार्थ पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे सोमवारी (दि.१८) रात्री जाहीर सभा झाली. या सभेत ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे बोलत होत्या. टेंभुर्णी येथे झालेल्या सभेवेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बहुजन रयत परिषदेने बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याचे निवेदन दिल्यानंतर ॲड. कोमलताई तातडीने अळकुटी येथील सभेसाठी रवाना झाल्या. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची तोफ पक्षाच्या उमेदवारांसाठी धडाडत असताना त्यांच्याच कन्या असलेल्या ॲड. कोमलताई पारनेरच्या सभेत काय बोलणार याकडे पक्षातील मान्यवरांसह स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांचेही लक्ष लागले होते. विविध दाखले आणि आपल्या समर्पक शैलीत बोलताना ॲड. कोमलताई यांना या सभेत मोठा प्रतिसाद मिळाला.

अळकुटी येथील व्यासपीठावरून बोलताना ॲड. कोमलताई म्हणाल्या की, खासदार निलेश लंके यांचे करोना काळातील काम सर्वांनीच पाहिले आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून राणीताई याही लोकांच्या मदतीला धावल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी हे विसरू नये. कर्ण कितीही दानशूर असला तरी तो दुर्योधनाच्या बाजुने असल्याने त्याची साथ द्यायची म्हणजे दुर्योधनाची साथ देण्यासारखेच आहे. आज विरोधक विविध योजनांच्या वल्गना करता. परंतु. शरद पवार साहेबांमुळेच महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. महिलांना मालमत्तेत समान हक्क, मोफत शिक्षण यासह राजकारणात महिलांसाठी आरक्षण असावे हा विचार पवार साहेबांचा आहे, हा सगळा विचार करता पवार साहेंबासाठी राणीताई शेळके यांना निवडून देणे गरजेचे ठरणार आहे. नगर तालुक्याची लेक असलेल्या राणीताई लंके यांनाच या निवडणुकीत भरभरून मतदान झाले पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या साथसोबतीने येथे तुतारी वाजणारच, असा विश्वासही ॲड. कोमलताई यांनी व्यक्त केला. यावेळी ॲड. कोमलताई यांच्या भाषणाला टाळ्यांच्या गजरात महिला भगिनीनी साथ दिली. व्यासपीठावर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेला स्थानिक कार्यकर्ते तसेच महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. 

लक्ष्मणराव ढोबळेंची कन्या शोभते 
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे शिष्य अशी ओळख असलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजपला  रामराम करीत राष्ट्रवादी कॅाग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर पवार यांनी ढोबळेंवर उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सोपविली तसेच त्यांच्या भाषणांमुळे पश्चिम महाराष्ट्रात पक्षाच्या उमेदवारांनी विरोधकांसमोर मोठे आव्हान निर्माण केलेले असताना त्यांच्या कन्या ॲड. कोमलताई यांनीही पारनेरच्या सभेत आपल्या संभाषण काैशल्याव सभा गाजविली त्यामुळेच ढोबळेंची कन्या शोभते, अशी प्रतिक्रिया स्थानिक ज्येष्ठांनी व्यक्त केली.