Advertisement
बहुजन रयत परिषदेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बिनशर्त पाठिंबा
सोलापूर : लोकसभा निवडणूक काळापासून जो मुद्दा प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता, तो विषय म्हणजे बहुजन रयत परिषद कुणाला पाठिंबा देणार? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यरत राहून वंचित बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी काम करणारी ही संघटना आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा देत आहे, अशी घोषणा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे- ढोबळे यांनी केली.
टेंभुर्णी येथील जाहीर सभेत ॲड. कोमलताई यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना याबाबतचे निवेदन दिले. या निवेदनात ॲड. कोमलताई यांनी म्हटले आहे की, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यान जनतेचा पक्ष आहे. गेली सहा दशकं राजकारणात सक्रीय राहून जनहिताचे निर्णय घेणारे पवार साहेब हे सर्वसामान्यांचे नेते आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार, कृषी, क्रीडा... क्षेत्र कुठलंही असो, साहेबांनी विविध क्षेत्रात मुशाफिरी करत आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटविला. कृषिमंत्री असताना त्यांनी अन्नधान्य उत्पादनात देशाला प्रगतीपथावर नेलं. जवळपास 72 हजार कोटींचं शेतकरी कर्ज त्यांनी माफ केलंच; याशिवाय मागासवर्गीय महामंडळांची कर्जे देखील माफ केली. संरक्षण खात्यात महिलांना संधी, राजकारणात आरक्षण, महिलांचे शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सुरक्षा यात महाराष्ट्राने अन्य राज्यांच्या तुलनेत देशात आघाडी घेतली ती पवार साहेबांच्या महिला धोरणामुळे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जगाच्या स्पर्धेत आणण्याचे मोठे कार्य त्यांनी केलं. कष्टकरी, शेतकरी, वंचित बहुजनांच्या प्रश्नांना न्याय दिला. बहुजनांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या हाताला बळ मिळावं, यासाठी आम्ही आज सोलापूर येथे शरदचंद्रची पवार साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याकडे बहुजन रयत परिषद राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा देत असल्याचे पत्र सादर केले, असे ही ॲड. कोमलताई यांनी नमूद केले. यावेळी राज्यभरातील संघटनेचे कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.