Advertisement
गोविंदबागेत दिवाळी पाडव्या निमित्त शरद पवार आणि लक्ष्मणराव ढोबळे रमले आठवणीत
बारामती : दिवाळीचा पाडवा आणि बारामतीतील गोविंदबाग हे अतिशय वेगळे नाते आहे. दिवाळी पाडव्या निमित्ताने भेटायला येणाऱ्या आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा ज्येष्ठ नेते शरद पवार स्वीकारत असतात. राजकीय घडामोडीमुळे आजच्या दिवाळी पाडव्याला वेगळे महत्व आले होते. त्यातही यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती शरद पवार यांचे अतिशय जुने मित्र, सहकारी आणि शिष्य लक्ष्मणराव ढोबळे यांची भेट. राजकीय ताटातुटीतून वेगळे झाल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी बारामतीतील पाडवा भेटीत गुरु-शिष्य एकत्र दिसले. यावेळी ढोबळे यांनी पवार यांना दिवाळी शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील मैत्रीभाव सर्वांनाच स्पष्टपणे जाणवले, ढोबळे यांच्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा सर्व काही सांगून गेल्या.
बारामतीतील गोविंद बागेत होणारा दिवाळी पाडवा भेट कार्यक्रम याही वर्षी परंपरेप्रमाणे झाला. मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असल्या तरी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले होते. पवार यांचे शिष्य लक्ष्मणराव ढोबळे यांनी ही गेल्या काही वर्षांपासूनची अखंडितपणे परंपरा सुरू ठेवली. पवार साहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा देत गुरुचे आशीर्वाद घेतले. यावेळी अनेक जुने सहकाऱ्यांची भेट झाल्याने ढोबळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, तेजोमय झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख.... या आनंदाच्या क्षणी आपली माणसं जवळ नसतील तर ना त्या सणाला अर्थ उरतो, ना त्या आनंदाला. तसा तर दरवर्षी दिवाळी सण येत होता आणि जात होता. शुभेच्छा दिल्या घेतल्या जात होत्या. मिठाई वाटली जात होती; पण त्या मिठाईतला गोडवा हरपला होता. गेली दहा वर्ष आपल्या माणसांपासून दुरावलो आणि आयुष्यातलं ध्येय, आनंद सारंच दुरावत गेलं. तो आनंद, ती माझी माणसं आणि माझं ध्येय आज मला पुन्हा एकदा नव्यानं गवसल आहे. माझं प्रेरणास्थान, माझा वाटाड्या, माझा मार्गदर्शक, माझं दैवत आणि माझी ऊर्जा.., म्हणजेच आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा हात आता माझ्या पाठीवर आहे, याचा मोठा आनंद आहे.
गोविंद बागेच्या या परंपरचे लक्ष्मणराव ढोबळे गेली अनेकवर्ष साक्षीदार आहेत, याबाबत त्यांना विचाले असता ते म्हणाले की, शरद पवार यांचे थोरले बंधू स्वर्गीय अप्पासाहेब पवार यांनी पवार कुटुंबीयांनी दिवाळीत एकत्र जमावे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. वर्षभर वेगवेगळ्या कामानिमित्त जगभरात फिरणारे पवार कुटुंबीय चार दिवस तरी एकत्र यावेत ही आप्पासाहेब पवार यांची इच्छा असायची. त्यानुसार त्यांनी सर्वांना वडीलकीच्या नात्याने आदेश देत सर्वांनी एकत्र यावे असे सुचवले अन त्यांच्या काळापासूनच ही प्रथा सुरू झाली. तेंव्हापासुन दिवाळीत पाडवा आणि शरद पवार यांची भेट हे अनेकांचे अतूट समीकरण झाले. आमदार, खासदार, मंत्री असो वा सामान्य नागरिक सर्वजण फक्त पवार साहेबांच्या भेटीच्या ओढीने येतात. शरद पवार आणि बारामतीकर यांचे वेगळे समीकरण आहे 1967 पासून शरद पवारांनी बारामती वर निर्विवाद वर्चस्व गाजविले राजकारणापेक्षा ही पवार यांचे आमच्या ढोबळे सारख्या कुटुंबासोबत असलेले जिव्हाळ्याचे व घनिष्ठ संबंध हा पाडवा भेटीमागील खरा दुवा आहे. काहीही घडो मात्र गेल्या अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे. यंदाही ही परंपरा कायमच राहिली, पवार साहेबांशी असलेल माझं शिष्याच नातं या निमित्ताने आज पुन्हा एकदा अधोरेखित झालं. याचा आनंद असल्याचे ढोबळे यांनी स्पष्ट केले.