Advertisement
नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मतांमधील 7.83 टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी 5 नंतर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या? याचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगाने जाहीर करावेत, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे.
एका दिवसात तब्बल 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ कशी झाली? असा सवाल देखील नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे. मतांच्या टक्केवारीतील तफावत पाहता हा प्रकार गंभीर व चिंताजनक वाटत आहे. मतांच्या या वाढीबद्दल जनतेच्या मनातच शंका उपस्थित होत असतील तर त्या दूर करणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. निवडणूक आयोगाने स्वतः पुढे येऊन आपली भूमिका पुराव्यासह स्पष्ट करावी आणि जनतेच्या मनातील शंकांचे समाधानकारक उत्तर द्यावे, असे या पत्रात नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
1.03 टक्क्यांची तफावत कुठून ?
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 20 नोव्हेबर रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत 65.2 टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी 66.5 टक्के होती असे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने स्वत: अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत 1.03 टक्क्यांची तफावत कुठून आली? असा सवाल नाना पटोलेंनी केला आहे.