Advertisement
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष कोणताही असो घराणेशाहीचाच दबदबा दिसून आला. विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघापैकी 237 मतदारसंघात राजकीय वारसदार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं वास्तव आहे. महायुतीनं 94 उमेदवार घराणेशाहीतील दिले तर महाविकास आघाडीनं 100 उमेदवार दिले. यात भाजपनं 49 तर काँग्रेसनं 39 उमेदवार दिले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 26 तर शरद पवारांनी 39 उमेदवार दिले. दोन्ही राष्ट्रवादीच्या काँग्रेसची आकडेवारी एकत्र केल्यास घराणेशाहीतील सर्वाधिक उमेदवार हे राष्ट्रवादीनेच दिले होते.
विभागनिहाय घराणेशाहीचे उमेदवारांचा विचार केल्यास पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे 77 उमेदवार देण्यात आले. मराठवाड्यातून 39,खानदेश 38, विदर्भ 49 तर मुंबई आणि कोकणातून 34 घराणेशाहीचे उमेदवार देण्यात आले. घराणेशाहीतील 237 उमेदारांपैकी 89 उमेदवार विजयी झाले आहेत.
घराणेशाही केंद्रीत राजकारणामुळे सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी नाकारल्यानं सत्ता आणि संपत्तीचं केंद्रीकरण होऊन लोकशाहीचं डबकं होऊ शकतं अशी भीतीही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. राजकीय घराणेशाहीविरोधात सगळेच राजकीय पक्ष बोलत असतात. पण जेव्हा कृती करण्याची वेळ येते तेव्हा उमेदवारी मुलं-मुली आणि सगेसोयरे यांच्या गळ्यातच उमेदवारीची माळ घातली जाते. विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीच्या वारसदारांची संख्या पाहता हेच अधोरेखित होत आहे.