Advertisement
मुंबई : तुम्हाला आमच्यामुळे कुठेही अडचण येईल, असं आम्ही काहीही करणार नाही. कोणताही निर्णय घ्या...निर्णय घेताना माझी अडचण आहे, असं काही वाटून घेऊ नका, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी दिली. काल (27 नोव्हेंबर)ला पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. मात्र याचदरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून नेमकी माघार का घेतली, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 130 पेक्षा जागा मिळतील, असा कोणालाच अंदाज नव्हता. भाजपच्या नेत्यांना देखील इतक्या जागा मिळतील असं वाटलं नव्हतं. भाजपचा आकडा 132 पर्यंत पोहचला आणि शिंदे गटाचे सर्व गणित बिघडल्याचे बोलले जात आहे. अमित शाह, नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इथे उभा आहे, एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले. कुठही घोडं अडलेलं नाही. मी कुठेही काही अडून धरलेलं नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही नाराज वगैरे नाही, आम्ही नाराज होणारे नाही लढणारे लोक आहोत. एवढा मोठा विजय मिळाला, आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय असा ऐताहासिक विजय असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.