Advertisement
अवघ्या महाराष्ट्रातील वंचित बहुजन समाज गेली दहा वर्षं ज्या दिवसाची वाट पाहत होता, तो दिवस आज अखेर उजाडला आहे.महाराष्ट्रातील कष्टकरी, कामगार, मागासवर्गीय तसेच वंचित बहुजन समाजाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी आज मुंबई येथे खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हा दिवस राज्यातील कष्टकरी, कामगार, वंचित, मागास समाजाचे वाईट दिवस बदलवणारा ठरेल, यात शंका नाही.
नाशिकच्या बिटको कॉलेजमध्ये पवार साहेबांनी पहिल्यांदा प्रा. ढोबळे साहेबांची मराठी मुलूखाला ओळख करून दिली. त्यानंतर त्यांचं जे काम अविरतपणे सुरु झालं. पवार साहेबांच्या पायाजवळ ४० वर्षं अबाधित अशी सेवा करण्याचं, पोट निवडणुका पार पाडण्याचं आणि पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम ते करत राहिले. पण मध्येच सासूच्या जाचाला कंटाळून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आता सासूचा जाच संपला म्हणून ते निवांत झाले खरे, तेवढ्यात दारात पुन्हा सासू हजर..! जिथं तू-तिथं मी म्हणत सासू तिथं पण त्यांच्या मागं आली आणि म्हणून पुन्हा आपल्या घरी म्हणजेच पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षात येण्याचा ढोबळे साहेबांनी निर्णय घेतला. कारण ती आता सासू इथं नाहीये. हे घर सोडून गेलीय. त्यामुळं इथं येण्याची वाट मोकळी झाली. कुणाच्याही मध्यस्थीशिवाय, कुणाचाही हात न धरता ते आपल्या हक्काच्या घरी परतले. तसंही आपल्या घरी परत जायला कुणाच्या मध्यस्थीची गरज लागत नाही. मनात ओढ असावी लागते, एवढंच.
आता विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय. पुढच्या २० तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पवार साहेबांनी मोठ्या विश्वासानं ढोबळे साहेबांवर चार तालुक्यांची जबाबदारी दिली आहे. या संपूर्ण निवडणुकीमध्ये मंगळवेढा, सांगोला, मोहोळ, दक्षिण तालुका आणि माळशिरस या सर्व तालुक्यांमध्ये सतत फिरून तुतारीचा डंका वाजवून इतिहास घडविण्यासाठी आणि गेल्या १० वर्षांची उणीव भरून काढण्यासाठी ढोबळे साहेब सज्ज झाले आहेत. ढोबळे साहेबांनी आपल्या सर्वांच्या वतीनं ग्वाही दिलीय की, तुतारीचा रक्षणकर्ता नव्हे तर संविधानाचा रक्षणकर्ता, संविधानाचा योद्धा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनाचा रस्ता समाजाला दाखवणारा नेता म्हणून आम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू. त्यांचा शब्द खरा करून दाखविण्याची हीच वेळ आहे.
“ढोबळे कुटुंब आणि पवार कुटुंबाचे सहा दशकांचे ऋणानुबंध आहेत. आम्ही कुठंही काम केलं तरी आमच्या प्रेमात, नात्यात दोन्ही कुटुंबांनी कधीच अंतर पडू दिलं नाही. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी अनेक वर्षं ढोबळे साहेबांनी पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. आज ढोबळे साहेब महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि पुढची २५ वर्षं कशी असतील, याला दिशा देण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा वारसा घेऊन आज पुन्हा एकदा ते मोठ्या जबाबदारीनं काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ढोबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या नव्या पिढीला काम करण्याची संधी मिळणार आहे. पक्षाच्या बांधणीमध्ये त्यांनी आम्हा सगळ्यांना आणि राज्याला नेतृत्व आणि मार्गदर्शन करावे,” अशा शब्दात आनंद व्यक्त करून खा. सुप्रियाताई सुळे यांनी ढोबळे साहेबांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत केले आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या या नवीन प्रवासात भक्कमपणे पाठीशी उभा राहील. कारण आज महाराष्ट्राच्या मनासारखं घडलंय.