Advertisement
करमाळा : महायुतीकडून करमाळा मतदारसंघ भाजपला सुटावा अशी मागणी रश्मी बागल यांनी केली आहे. रश्मी बागल या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. करमाळ्यामधून भाजपकडून रश्मी बागल यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, त्या बाहेरील असल्याचं म्हणत बागल यांच्या नावाला स्थानिक शिवसेनेचा विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी दोन दिवसाआधी करमाळ्यातील शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बागल यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. रश्मी बागल यांनी करमाळा मतदारसंघातून 2019 साली शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र, यावेळी त्यांचा परभाव झाला होता. अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे विजयी झाले होते. या निवडणुकीनंतर रश्मी बागल यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे रश्मी बागल देखील निवडमुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे संजयमामा शिंदे हे अपक्ष असले तरी त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता. मात्र, यावेळी देखील त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ही जागा महायुतीकडून भाजपला सुटावी अशी मागणी जोर धरत आहे.